ऍपल टॅबलेटमुळे जगभरातील प्रकाशन व्यवसायाला नवसंजीवनी मिळेल का? या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळणार आहे. स्टीव्ह जॉब्स यांनी एव्हाना ऍपल टॅबलेट लाँच केलीय. ऍपल टॅबलेटमुळे गेम्स खेळता येतील, वेब सर्फ करता येईल, इ-बुक्स वाचता येतील आणि खूप काही ऍप्लिकेशन्स उपल्बध होतील. पण या सर्वांपेक्षा टॅबलेटमुळे जगभरात पडझडीला सामोऱ्या जाणाऱ्या वृत्तपत्र, मासिकांना जीवदान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
जगभरात गेली पंधरा वर्षे वृत्तपत्रे आणि मासिके नेटवर मोफत उपलब्ध आहेत. पण हा प्रयोग सपशेल फसल्याचं सिध्द झालंय. आता न्यूयॉर्क टाईम्स सारख्या वृत्तपत्रांनी आपल्या वेबसाईटसाठी शुल्क आकारण्यास सुरवात केली आहे. अमेरिकेत अनेक वृत्तपत्रांना कन्टेंटसाठी शुल्क आकारायचे होतं पण यासंबंधी पहिलं पाऊलं उचलण्याची कोणाचीही तयारी नव्हती.
पण केवळ वेबसाईट शुल्क आकारण्याने वृत्तपत्र आणि मासिकांचा तोटा भरून निघण्याची शक्यता नाही. पण या टॅबलेटमुळे ते शक्य होईल कारण उत्पन्नाचा आणखी एक स्त्रोत उपलब्ध होणार आहे.
मोफत कन्टेंट देण्याचे दिवस कधीच संपले आहेत. वेबवर मोफत कन्टेंट उपलब्ध करुन देण्याची घोडचूक वृत्तपत्र आणि मासिकांनी सुरवातीच्या दिवसात केली आणि ती त्यांच्या
अंगलट आली. त्यावेळी वेबवरील जाहिरातींमधून उत्पन्न मिळेल हा अंदाज चुकीचा ठरला. सुरवातीला काही काळ वेबवरील बॅनर ऍडसवर लोक उत्सुकतेपोटी क्लिक करायचे पण नंतर ती डोकेदुखी ठरु लागल्याने ते त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करु लागले.
गेल्या काही वर्षात अमेरिकेत अनेक वृत्तपत्रं बंद पडली आणि हजारो जणांना नोकरी गमवावी लागली. सिएटल पोस्ट इंटेलिजन्सर सारख्य़ा वृत्तपत्राला रोज दोन लाख तर रविवारी पाच लाख वाचकवर्ग होता पण या वृत्तपत्रालाही गाशा गुंडाळावा लागला.
सरकार आणि उद्योगजगतावर अंकुश ठेवणाऱ्या लोकशाहीच्या चौथ्य़ा स्तंभाचे अस्तित्वच धोक्यात आलंय. त्याचे कारण जोपर्यंत मोफत कन्टेंट द्यावा लागतोय तोवर खर्चाचा मेळ कसा घालायचा हा प्रश्न सुटणार नाही. ज्यांना कन्टेंट मोफत हवाय त्यांनी हे लक्षात घ्यायला हवं की बातम्या मिळवण्यासाठी, लिहिण्यासाठी आवश्यक त्या मनुष्यबळाला पगार द्यावा लागतो. देअर इज नो सच थिंग ऍज फ्री लंच ही इंग्रजी म्हण इथे चपखलपणे उपयोगी पडते. गुगलव्यतिरिक्त कोणालाही नेटवर कन्टेंट मोफत देणं जमलेलं नाही हे इथे लक्षात घेण्यासारखं आहे.
काही जणांना बातम्या या कमोडिटीसारख्य़ा आहेत असं वाटण्याची शक्यता आहे. न्यूज एजन्सीच्या माध्यमातून या कमीत कमी खर्चात संकलीत करुन जगभरातल्या वृत्तपत्रांना आणि वेबसाईटना स्वस्तात उपलब्ध करुन देता येतील. तसंच या बातम्या वेबवर मोफत उपलब्ध करुन देणं शक्य आहे असं काही जणांचे मत असू शकतं.
पण न्यूज एजन्सीज बातम्यांमध्ये वॅल्यू ऍडिशन करु शकत नाही हे लक्षात घ्यायला हवं. बातमीचं विश्लेषण करणं, त्यावर सखोल अभ्यास करुन मत नोंदवणं आणि
विस्तृत विवेचन करणं यावर समाजाचं वैचारिक पोषण अवलंबून असतं.
गेल्या काही वर्षात महत्वाच्या प्रकरणांमध्ये शोध पत्रकारितेच्या मार्गाचा अवलंब होऊ शकला असता, पण तो तसा झाल्याचं दिसत नाहीये. दर्जेदार वार्तांकनासाठी योग्य ती किंमत मोजण्याची लोकांची तयारी असावी लागते हे यामागचं सूत्र आहे.
वेबवरील वृत्तपत्रासाठी कोणीही पैसे मोजण्यास तयार होणार नाही असं मत काही जण नोंदवू शकतात. पण वॉल स्ट्रीट जर्नल प्रती वर्ष 100 डॉलर्स शुल्क आकारते आणि अनेक व्यवसायिक हे शुल्क भरतात. वॉल स्ट्रीट सारख्या दर्जेदार बिझनेस न्यूज इतर कोणीही देऊ शकत नाही. त्यामुळे दर्जेदार बातम्यांसाठी तसंच विश्लेषणासाठी लोक पैसे मोजण्यास तयार आहेत हे यामुळे सिध्द होत.
इकॉनॉमिस्टही आपल्या वेबसाईटसाठी प्रती वर्षी 95 डॉलर्स शुल्क आकारते. अनेक ब्रिटीश वृत्तपत्रं क्रॉसवर्ड कोड्यांसाठी शुल्क आकारतात. हे कन्टेट एक्सक्लुझिव्ह असल्याने लोक आनंदाने पैसे मोजतात. फ्रान्समध्येही लोकं वृत्तपत्रांच्या वेबसाईटसाठी प्रती वर्षी ६०-८५ युरोज शुल्क भरतात. जगभरातील अनेक वृत्तपत्र आणि मासिकांनी मोफत वेबसाईट कन्टेंट देणं बंद केलंय.
आता येऊ घातलेली ऍपल टॅबलेट वृत्तपत्रजगतासाठी शक्तीवर्धक औषध ठरण्याची शक्यता आहे. या आधी ऍपलच्या आयपॉडने संगीत ऐकण्याची आणि आयफोनने फोनवर इंटरनेट मल्टिमिडीया ऍक्सेसची पध्दतच बदलून टाकली. आता ऍपलची टॅबलेटही जगभरात एक नवी तंत्रज्ञान क्रांती घडवण्याची दाट शक्यता आहे. ऍपल फिचर्स, इंटरफेस आणि उपयुक्ततेच्या बाबतीत जगातील इतर कोणापेक्षाही सरस आहे. त्यामुळेच टॅबलेटवर वृत्तपत्र वाचणं हा आंनददायी अनुभव ठरेल अशी आशा आहे. वृत्तपत्र आणि मासिकांनाही मल्टिमीडियाद्वारे कन्टेंट उपलब्ध करुन देणं सहज सोपं होईल. हे कन्टेंट पोर्टेबल स्क्रीनवर वाचता येईल अशा पध्दतीने डिझाईन करता येणार आ
हे. हार्डवेअरला सहाय्यभूत ठरणाऱ्या सॉफ्टवेअरवर त्याची यशस्विवता अवलंबून असते. यासाठी ऍपलचं आयट्यून स्टोअर्स मोठं पाठबळ पुरवेल. ऍपल आयट्यूनच्या माध्यमातून कन्टेंट तसंच लोकांच्या पसंतीची वृत्तपत्रं आणि मासिकं उपलब्ध करुन देऊ शकेल. लोकांनाही वेगवेगळ्या वृत्तपत्र आणि मासिकांच्या वेबसाईटपेक्षा आयट्यून स्टोअरमध्ये निवडीला वाव मिळेल. वार्षिक वर्गणी किंवा सिंगल इश्यू असो ऍपल टॅबलेटवर वाचण्याकरता वृत्तपत्र आणि मासिकं आयट्यून स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होऊ शकतील.
हा बदल एका रात्रीत घडणार नाही. सुरवातीला फक्त टेक्नोसॅवी ऍपल टॅबलेटचा उपयोग करतील. पण भविष्यातीत बदल टॅबलेटमुळे वेगाने होतील आणि प्रिंट मीडियाचा चेहरामोहरा बदलून टाकतील हे मात्र निश्चित. भविष्यात या नवीन उपकरणाच्या माध्यमातून नवीन प्रयोग केले जातील तसंच अनेक वृत्तपत्र आणि मासिकं टॅबलेट आवृत्त्या उपलब्ध करुन देतील.
एकूण काय ऍपलची टॅबलेट वृत्तपत्र आणि मासिकांसाठी व्हिटॅमीन टॅबलेट किंवा बूस्टर डोस ठरणार आहे.